संपादकीय

भारतीय नागरिकाला सलाम

गेली ७० वर्षे आम्ही तुकड्यातुकड्यांनी बदल करतो आहोत. आता अर्थक्रांती म्हणते तसे मुळातून बदल करण्याची वेळ आली आहे. त्या दिशेने जाण्यासाठीची एक अवघड परीक्षा गेले दोन महिने देश देत होता. त्या परीक्षेत सामान्य भारतीय नागरिक उत्तीर्ण झाला आहे. भारतीय नागरिकाला सलाम करायचा तो त्यासाठी !
मोठ्या नोटा अंशत: बंद केल्यामुळे गेले दोन महिने आपल्या देशात जे काही झाले, ते अभूतपूर्व आणि ऐतिहासिक आहे. नोटाबंदीचा सामान्य जनतेला किती प्रचंड त्रास होतो आणि व्यवहार किती अडले आहेत, याचे वार्तांकन माध्यमे २४ तास करत होती. पण त्यामुळे विचलित न होता, या काळात आपले व्यवहार कमीत कमी रोख रकमेत कसे करता येईल, याचा विचार विचारी भारतीय नागरिक करत होते. त्यामुळेच ‘नाहीतर दंगली होतील’, अशी स्फोटक आणि अनुचित भाषा वापरणाऱ्या न्यायालयाच्या टिप्पणीलाही या नागरिकांनी गांभीर्याने घेतले नाही. बँका आणि एटीएमसमोर दररोज रांगा लागत होत्या, मध्येच रक्कम संपल्याने रांगेतील नागरिक परत जात होते. त्यांची त्या त्या वेळी किती गैरसोय झाली असेल, याची कल्पना करवत नाही. पण त्यांनीही आपला राग सार्वजनिक संपत्तीवर काढला, असे झाले नाही.
सत्तरी, ऐंशीच्या दशकातील आंदोलने ज्यांनी पाहिली आहेत, त्यांना हा मुद्दा चांगला लक्षात येईल. सरकारी म्हणजे सार्वजनिक साधनसंपत्तीचे नुकसान करणे आणि ते झाले की आंदोलन यशस्वी झाले, असे त्यावेळी मानले जात होते. अर्थात, त्याचे कारणही तसेच आणि फार महत्वाचे होते. ते म्हणजे सरकार आपले शत्रू आहे, असेच मानण्याची पद्धत होती. आपण सार्वजनिक संपत्ती, साधनांची नासधूस, जाळपोळ करत आहोत, म्हणजे सरकारची कशी जिरवली, असा समज संतप्त नागरिक करून घेत असत. सरकार म्हणजे एक व्यक्ती नव्हे, किंवा एक संस्था नव्हे, ते आपणच निवडून दिले असून ते त्यांच्या मर्यादेतते राज्यकारभार सांभाळत आहेत, हे भान अजून समाजाला यायचे होते.
राजकीय बदल करताना याच सामान्य नागरिकांनी आपले शहाणपण वेळोवेळी दाखवून दिले आहे. आपण किती मोठे राजकीय विश्लेषक आहोत, अशी शेखी मिरविणाऱ्यांना याच नागरिकांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. सामान्य माणसाने आपला विवेक असा कायम जागा ठेवला आहे, याची अशी शेकडो उदाहरणे सांगता येतील. चार पुस्तके वाचून सर्व बुद्धिमत्ता ही आपली मालमत्ता आहे, असे मानणाऱ्या बहुतेकांनी त्याला सतत अनेक दुषणे दिली. त्याला बावळट मानले. त्याच्यामुळेच सर्व समस्या वाढल्या, असे आरोप केले. एवढेचनव्हे तर या महाकाय, वैविध्यपूर्ण आणि मुळात प्रामाणिक असलेल्या समाजाला लागू होण्याची शक्यता नसलेल्या पाश्चात्य पद्धतीत त्याला बंदिस्त करण्याचे प्रयत्न केले. आपण कसे जगावे, हे त्याला कळत नाही, असे सतत सांगण्याचा धोशा लावला. सर्वसामान्य भारतीय समाज त्यामुळे इतक्या आत्मवंचनेत अडकला की आपल्यात काही चांगले आहे, हेच तो विसरून गेला. दुसऱ्यांच्या जगण्याची कॉपी करणे, हेच चांगले जगणे, असा त्याचा समज करून देण्यात आला.जो समाज मानवी जीवन हा एक सोहळा मानत होता, तो त्याच जीवनाला कसेबसे ओढत जगू लागला. त्याला कुतरओढ म्हणतात. त्याला गरज होती ती चांगले जीवन जगण्यासाठी आवश्यक त्या भौतिक साधनांची. पण त्याची व्यवस्था न करता त्याला जीवनपद्धतीचे तेच तेच धडे देण्यात आले. या धड्यांची गरज नव्हती, असे नाही, ती आजही आहेच. पण ती साधनांच्या बरोबरीने आली पाहिजे, हे धुरीण म्हणविणारे विसरून गेले.

या देशाचा माणूस चुकला नाही, चुकली ती व्यवस्था, असे अर्थक्रांती प्रतिष्ठान गेले १६ वर्षे म्हणते, त्याचे कारण हेच आहे. याच भारतीय नागरिकाने अनेक विसंगतीने भरलेली असताना लोकशाही जीवंत ठेवली. विषमतेने टोक गाठले तेव्हा या देशातील चार लाख शेतकऱ्यांनी स्वत:ला संपविले. पण चोरीमारी, लबाडीचा मार्ग निवडला नाही. संपत्तीने मुजोर झालेल्या आमच्यातीलच अनेकांनी साधनसंपत्तीचेलाजीरवाणे जाहीर प्रदर्शन केले तरी, त्याने आपला तोल ढळू दिला नाही. सरकार नावाच्या व्यवस्थेचा आधार वर्षानुवर्षे मिळतनाही, हे जाणून त्याने घाम गाळला, रक्त आटवले आणि स्वत:च्या कुटुंबाला सुरक्षित करून घेण्याची पराकाष्ठा केली. भारतीय नागरिकाचे जीवन हे असे अडथळ्यांच्या शर्यतीने भरलेलेच राहिले आहे. त्याची या प्रवासात जी प्रचंड ओढाताण झाली आणि त्यात त्याला जे भोगावे लागले, तेनुकसानकधीही भरून येणारे नाही. इतकी मोठमोठी आव्हाने पेलणारा भारतीय नागरिक कागदी नोटाबंदीनेविचलित होण्याची शक्यता नव्हतीच. त्यामुळेच त्याने हा त्रास एका आमुलाग्र बदलाची सुरुवात आहे, असे मानले आणि स्वीकारला.
गेली ७० वर्षे आम्ही तुकड्यातुकड्यांनी बदल करतो आहोत. आता अर्थक्रांती म्हणते तसे मुळातून बदल करण्याची वेळ आली आहे. निमुद्रीकरणामुळे अशा मुळातून बदलाच्या दिशेने सरकार विचार करू लागले आहे, असे स्वागतार्ह संकेत येत आहेत. त्यासाठी भारतीय नागरिक तयार आहे काय, याची एक अवघड परीक्षा गेले दोन महिने सुरु होती. त्या परीक्षेत सामान्य भारतीय नागरिक उत्तीर्ण झाला आहे. भारतीय नागरिकाला सलाम करायचा तो त्यासाठी!


श्री. यमाजी मालकर
ymalkar@gmail.com


मागील संपादकीय लेख :